पुणे पोलीस आयुक्तांनी केलेलं ‘ते’ विधान चुकीचं : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी बद्दल शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक विधान केलं आहे की, कोरोनामुळं बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यातून गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या अधिकाऱ्यानं अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. शहरातील सध्याच्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुणे शहरातील वाढत्या खुनाच्या आणि इतर गुन्ह्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले, “पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना परिस्थितीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या कामात प्रशासन, डॉक्टर, पोलीस आणि पत्रकार चांगल्या प्रकारे काम करत आहेत. यात पत्रकार प्रत्येक वेळी कोरोना बाबत नागरिकांमध्ये प्रोबधन करत आहेत. ही कौतुकाची बाब आहे.”

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “मी आज प्रवासादरम्यान पुण्यात काही ठिकाणी पाहिलं तर अद्यापही काही नागरिक मास्क वापरत नाहीत. हे पाहून चिंता वाटली. पोलीस विभागाकडून आज मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींच्या कारवाईचा आढावा घेतला. यात जिल्ह्यात तब्बल 11 कोटी रुपये जमा झाले आहेत. यातून एकूणच जिल्ह्याची परिस्थिती लक्षात येत आहे.” असंही त्यांनी सांगितलं.