‘PM Vs DM’ ? : एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्याने ठाकरे सरकार समोरील अडचणीत वाढ झाली. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला. हे वृत्त समोर येताच भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, आमची जबाबदारी न्यायाने वागणे ही असते. तपास हा झालाच पाहिजे आणि कोणी दोषी असेल तर शिक्षाही झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, कोणाला मुद्दाम अडकवता कामा नये. पोलिसांना नि:पक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या काळातही हीच पोलीस यंत्रणा होती. मात्र आता ते पोलिसांवरच अविश्वास दाखवत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.