सदाशिव पेठेतील फार्मा डिस्ट्रीब्यूटरचे दुकान आगीत भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सदाशिव पेठेतील जीवन फार्मा डिस्ट्रीब्यूटर्सच्या दुमजली दुकानाला गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या व जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र या आगीत संपुर्ण दुकान भस्मसात झाले असून , लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.


सदाशिव पेठेत फार्मा डिस्ट्रीब्यूटर्सची दुकाने आहेत. येथे जीवन फार्मा डिस्ट्रीब्यूटर्स हे एका बहुमजली इमारतीमध्ये दोन मजल्यांवर आहे. दुकानात औषधे मोठ्या प्रमाणावर साठविलेली असतात. दरम्यान नागनाथ पार येथे जीवन फार्मा डिल्ट्रीब्यूटर्स हे दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करण्यात आले होते. त्यावेळी गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास दुकानात आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी दुकानातून धूर येत असल्याचे पाहून याची माहिती अग्निशमन दलाला दिली. दुकानाचे मालक परिसरातच राहात असल्याने तेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुलुप काढून शटर उघडले.अग्निशमन दलाचे जवान 5 फायरगाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमध्ये वर राहणाऱ्या रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ खाली बोलवले. त्यांनी दुकानात पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. परंतु औषधे व रसायनांमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. दुकानातील सर्व औषधी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. इमारतीमध्ये स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद होती. असे अग्निशमन दलाचे स्टेशन ड्यूटी ऑफिसर विजय भिलारे यांनी दिली. शहरातील मोठ्या इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन यंत्रणा सुरु करण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. जेणेकरून आग लागल्यास प्राथमिक मदत मिळू शकेल.

ही आग स्टेशन ड्य़ूटी ऑफिसर विजय भिलारे, राजेंद्र जगताप, सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, फायरमन मंगेश मिळवणे, शकील सय्यद व इतर जवानांनी आटोक्यात आणली.

You might also like