Holi 2020 : होळी दहनामागील आख्यायिका, जाणून घ्या ‘महत्व’ आणि शुभ ‘मुहूर्त’

पोलीसनामा ऑनलाईन : उद्या (९ मार्च ) होळी देशभरात साजरी होणार आहे. महाराष्ट्रातील कोकण भागात होळीला ‘शिमगा’ म्ह्णूनही ओळखले जाते. उत्तर भारतामध्ये ब्रज होळीचा थाट काही औरच असतो. वाराणसी आणि मथुरेमध्ये खास पाणी आणि फुलांची उधळण करून होळी साजरी केली जाते. त्यात यावेळी एकमेकांवर रंग टाकून होळी सेलिब्रेट करण्यासोबतच महिला पुरूषांना लाठी किंवा कपड्यांपासून बनवलेल्या चाबूकाने एकमेकांना फटकवण्याचीही परंपरा आहे. मथुरा आणि वृंदावन मध्ये होळी तब्बल 15 दिवस सेलिब्रेट केली जाते.

आख्यायिका :
विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. ह्या उस्तवाची परंपरा लहान मुलांना त्रास देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे शोधली जाते. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने पाठविलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर दिला होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

महत्व :
होळीच्या एक महिना अगोदरच पूजेची सर्व तयारी सुरू असते. घरात सुख – शांती, समृद्धि, नांदण्यासाठी आणि संतान प्राप्तीसारख्या अनेक गोष्टींसाठी महिला या दिवशी होळीची पूजा करतात. अनेक सुकलेल्या झाडांची फांदी जमा केली जाते. आणि होळीच्या दिवशी त्यांना एकत्र करून पूजा करून पेटवले जाते. तसेच शेणाच्या गोऱ्या देखील पेटवल्या जातात.

होळी दहनाचा मुहूर्त :
दरम्यान, होळी ९ मार्चला पहाटे ३ वाजून ३ मिनिटांनी सुरू होणार असून रात्री ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त २ तास २६ मिनिटं आहे. ९ मार्चला संध्याकाळी ६ वाजून २६ मिनिटं ते ८ वाजून ५२ मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असेल.