केरळमधील अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात विविध ठिकाणी कामानिमित्त गेलेले मजुर, नागरिक अडकून पडले आहेत. शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हिंगोली शहरात केरळ राज्यातील जवळपास ४० नागरिक अडकून पडले होते. अखेर १५ मे रोजी या सर्वांना प्रशासकीय अधिकायांच्या उपस्थितीत खाजगी बसने रवाना करण्यात आले.

केरळ राज्यातून हिंगोली येथे कामानिमित्त आलेल्या काही युवकांना अडकून पडावे लागले. एका खाजगी कंपनीत कामासाठी हे नागरिक आले होते, परंतु संबंधित कंपनीतील अधिकाºयांनीही ऐनवेळी हात वर केल्यामुळे या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मायदेशी परतण्यासाठी सर्वजन आटापीटा करीत होते. त्यांनी पायी चालतच नांदेड गाठले. परंतु या सर्वांना परत हिंगोलीत आणण्यात आले. व शहरातील एका ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. परंतु काही दिवसांनी परत त्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. याच दरम्यान केरळमधील हिंगोलीत वास्तव्यास असलेले दोसा सेंटरचे व्यावसायिक अजयकुमार यांच्या संपर्कात ही सर्व मंडळी आली. यावेळी अजयकुमार यांनी सामाजिक बांधिलकी जपत या सर्वांना आसरा दिला, भोजनाचीही व्यवस्था केली. तसेच अजयकुमार यांचेही काही नातेवाईक हिंगोलीत अडकून पडले होते. विशेष म्हणजे अडकून पडलेले नागरिक केरळ सरकारला वारंवार संपर्क करीत होते. अखेर केरळहून महाराष्टÑातील अकोला व जळगाव येथे दोन खाजगी बस आल्या होत्या. त्यामुळे या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून व प्रशासनाच्या नियमानुसार या सर्वांना याच बसमधून अखेर १५ मे रोजी मायदेशी रवाना करण्यात आले. लॉकडाऊनमुळे मागील अनेक दिवसांपासून हिंगोलीत अडकून पडलेल्या नागरिकांना रवाना केल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले.