विद्यार्थिनीला अंतर्वस्त्र काढायला लावले, NEET परीक्षेतील प्रकार

केरळ : वृत्तसंस्था

नुकतीच देशभरात पार पडलेली मेडिकल पात्रता परीक्षा (NEET ) अनेकठिकाणी वादग्रस्त ठरली आहे. यावेळी परीक्षेसाठी नवीनच नियमावली तयार केली होती. याच नियमांच्या नावाखाली विद्यार्थिनीला तिचे वक्षस्थळावरचे अंतर्वस्त्र काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यानंतर पर्यवेक्षक सतत त्या मुलीच्या छातीकडे पाहत होता असे विद्यार्थिनीने म्हटले आहे.

केरळमधील कोपा येथे हा प्रकार घडला आहे. मेटल हूक असल्याने तिला अंगवस्त्र काढायला सांगण्यात आले. त्यानंतर ती परीक्षेला बसल्यावर पर्यवेक्षक तिच्याकडे अत्यंत अश्लील नजरेने पाहत होता. त्यामुळे तिला परीक्षा देताना खूप त्रास झाला.अखेर परीक्षा झाल्यानंतर दोन दिवसांत तिने पर्यवेक्षकाविरूद्ध फिर्याद दिली आहे.

‘मी परीक्षा देत असताना तो माझ्या जवळ येऊन उभा राहिला. तो पूर्णवेळ माझ्या छातीकडे पाहत होता. त्याला शिक्षा झालीच पाहिजे’ असे तिने म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून पर्यवेक्षकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान ,यंदाची नीट परीक्षा नवीन नियमामुळे वादग्रस्त ठरली आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना कपडे काढायला लावणे तसेच कपड्याचा काही भाग कैचीने कापल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.