ग्रामीण भागातील विद्यार्थीच उद्याचा भारत घडवतील : ‘एमपीएससी’चे माजी अध्यक्ष कोकाटे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वाढत्या स्पर्धेच्या जगात योग्य मार्गदर्शन व नियोजन नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी पडत आहेत. परंतु, त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांचा उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा टक्का निश्चितच वाढेल, असा दावा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केला.
येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले. त्यावेळी राज्यसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष कोकाटे बोलत होते. माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करत पहिल्या एक-दोन वर्षातच लोकसेवा आयोगातील स्पर्धा परीक्षांसाठी नियमित दहा तासात पर्यंतचा अभ्यास केला, तर निश्चित यश मिळेल त्यासोबतच जर अपयश आले तर दुसरा पर्याय सुद्धा सोबत वापरला जायला हवा.
माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांनी या मार्गदर्शन केंद्रासाठी डिसेंबर महिन्यातच पाच लाखांची मदत देत डॉ. सर्जेराव निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची सुरुवात करावी, असे शरद पवार यांनी सांगितले होते. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश मिळवले ते फक्त शेतकरी कुटुंबातील कष्टाचा वारसा असल्यामुळेच.पुण्यामधील शाहू अकॅडमी च्या धर्तीवर नगर मध्ये सुद्धा हे मार्गदर्शन केंद्र संपूर्ण ताकतीने मी चालविल असा निर्धार डॉ. निमसे यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाही व मोफत मार्गदर्शन केंद्र चालवू, असेही ते म्हणाले.
 ग्रामीण भागातील विद्यार्थी संभाषणात कमी पडतात त्यामुळेच मौखिक परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अपयश पदरी येते ते दूर करण्यासाठी सदरील मार्गदर्शन केंद्र खूप महत्त्वाचे काम करेल असा विश्वास यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सिताराम खिलारी, दीपलक्ष्मी म्हसे, अॅड. माणिकराव मोरे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विद्यार्थी संघटना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमासाठी हॉल सुद्धा कमी पडला त्यामुळे विद्यार्थी खाली बसून कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू चंदनशिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जगताप यांनी केले.
Loading...
You might also like