सख्ख्या भावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या उपसरपंचाला गावठी कट्ट्यासह अटक

इंदापूरः पोलीसनामा आॅनलाईन
विहरीतील पाण्याच्या वादावरुन सख्ख्या भावाला पिस्तूलाने गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील बाभळगावच्या उपसरपंचाला गावठी कट्ट्यासह पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धनाजी वामन देवकर (रा. बाभूळगाव) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपीचा भाऊ संजय वामन देवकर (रा. बाभुळगाव) याने इंदापूर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला होता की,” माझा भाऊ धनाजी वामन देवकर हा माझ्याशी विहरीतील पाण्याच्या वादातून भांडण करतो आहे. तसेच तुला उद्यापर्यंत कुऱ्हाडीने वार करुन किंवा पिस्तूलाने गोळ्या घालून जीवे मारतो अशी धमकी दिली आहे. त्यामुळे माझ्या भावापासून माझ्या जीवाला धोका आहे. दाखल अर्जाची पडताळणी केल्यानंतर रात्र गस्तीचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निंबाळकर व त्यांच्या पथकाने आरोपीच्या गावाला भेट देऊन त्याचा सर्व ठिकाणी तपास घेतला तो त्याच्या घरात लपला असल्याची माहिती मिळाली. आरोपीस घराबाहेर येण्यास सांगितले असता, तो काही बाहेर आला नाही. घरात प्रवेश करुन तपासणी केली असता तो कुऱ्हाड घेऊन बसलेला दिसला. घराची बारकाईने झाडाझती केल्यानंतर टि.व्हीच्या पाठीमागे एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे सापडली. आरोपीला अटक करुन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर गावठी कट्टयाची तपासणी केली असता ते वापरातील अग्नी शस्त्र असल्याची खात्री झाली.

सदर कारवाई इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोंढे, पोलीस कर्मचारी पाटोळे यांनी केली. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.