आमदार भारत भालके समर्थकांची सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ च्या निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी दिलेली आश्वासने पूर्ण नकेल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी आंदोलन केले. याच आंदोलनाचा राग मनात धरून आमदार भालके समर्थकांनी संतोष माने यांना बेदम मारहाण केली आहे. हि घटना शनिवारी दुपारी मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी घडली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी आमदार भारत भालकेंनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून त्यांच्या विरोधात उपोषण धरले. दोन दिवस त्यांच्या उपोषणाकडे कुणी लक्ष नदिल्याने त्यांनी तिसऱ्या दिवशी स्वतःच्या दुचाकी गाडी वरून संपूर्ण मंगळवेढा शहरात घोषणा देत फिरण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्यांना भालके समर्थकांनी आडवले आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. संतोष माने यांनी भालके समर्थकांना नघाबरता आमदार भालके यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. या कृतीतून संतापलेल्या भालके समर्थकांनी संतोष माने यांना बेदम मारहाण केली.

संतोष माने यांना झालेल्या मारहाणी दरम्यान त्यांच्या अंगावरची कपडे देखील फाडण्यात आली आहेत. तसेच संतोष माने यांना शरीरावर इजा देखील झाली आहे. या घटनेच्या संदर्भात मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर आमदार भारत भालके हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत.