सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान, केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर विविध विषयांवर लोक भाष्य करत असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे नैराश्य, कारण सुशांत सिंह राजपूत काही दिवसांपासून नैराश्याचे आयुष्य जगत होता असे विविध माध्यमांतून समोर आले आहे. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या विषयाकडे आता लक्ष केंद्रित झाले आहे. या दरम्यान आता नैराश्य आणि मानसिक आजारावरील चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत.

या सर्व परिस्थितीच्या दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि विमा कंपनीवर नजर ठेवणाऱ्या आयआरडीएला प्रश्न विचारला आहे की मानसिकरीत्या आजारी असलेल्या रूग्णांना विमा का दिला जात नाही. एका जनहित याचिकेनुसार 2017 आणि 2018 मध्ये कायद्यात संशोधन करून मानसिक आजारांना विम्याअंतर्गत आणले गेले होते. मात्र विमा कंपन्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष करत याचे पालन केले नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे याबाबतीत चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत आतापर्यंतच्या तपासात असे आढळून आले आहे की, तो काही महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या खचलेला होता असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले असून त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून यासंदर्भात उपचार देखील सुरू होते. परंतु त्याच्या मानसिक तणावामागील कारण काय होते, याबाबत ठोस माहिती समजलेली नाही.