सर्वोच्च न्यायालयात आज ‘या’ 3 महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी, देशाचं ‘लक्ष’

पोलिसनामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी केली जाणार आहे. त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. विशेषतः विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेसह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय मराठा आरक्षण, राजस्थान सत्तापेच यावर तोडगा काढण्यासाठी सुनावणी होणार आहे.

विद्यापीठ आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी आव्हान दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये 16 टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात 12 टक्के व सरकारी नोकर्‍यांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तसेच राजस्थानमधील सत्तापेच कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभेचे अधिवेशन 31 जुलैला बोलावण्याची विनंती करणारा सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे पाठविला होता. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी 18 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे हा सत्तापेच निर्माण झाला आहे.