Pimpri News : बक्षीसाचा मोह पडला 20 लाखांना, महिंद्रा SUV 500 गाडी मिळविण्याच्या नादात झाली फसवणूक

पिंपरी : आपल्याला बक्षीस मिळावे, अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. त्यातूनच पूर्वी लॉटरीचा धंदा भरभराटीला आला होता. मटक्यामध्येही हाच मोह असतो. पण काळ बदला असला तरी माणसाची सुप्त इच्छा तीच राहिली. याचा गैरफायदा सायबर चोरटे घेत असल्याचे दिसून आले आहे. महिंद्रा कंपनीची एस़ यु़ व्ही ५०० गाडी (Mahindra SUV 500) बक्षीस लागल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २० लाख ८८ हजार ३५० रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अनिलकुमार तिवारी (वय ५१, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिसांकडे (Sangvi police) फिर्याद दिली आहे.

तिवारी यांना २८ ऑगस्ट रोजी एका महिलेने स्नॅपडीलमधीून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमच्या कंपनीचा ऑक्सीमीटर घेतला आहे. तुम्हाला महिंद्रा कंपनीची एस़ यु़ व्ही़ ५०० ही गाडी बक्षीस मिळाली आहे, असे सांगितले. हे बक्षीस मिळविण्यासाठी तुम्हाला गाडीचे कर द्यावे लागतील, रेजिस्ट्रेशन फी भरावी लागेल, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या लोकांच्या बँक खात्यात पैसे भरायला सांगितले. बक्षीसाच्या मोहापायी तिवारी हे ते सांगतील, त्याप्रमाणे पैसे भरत गेले. पुढे इतके पैसे भरल्यावर आता पुढचे पैसे भरले नाही तर, अगोदर भरलेले पैसेही मिळणार नाहीत आणि बक्षीसही मिळणार नाही, असे सांगितल्याने ते पैसे भरत गेले. एकूण २० लाख ८८ हजार ३५० रुपये भरले तरीही त्यांना गाडी दिली नाही़ तसेच त्यांनी दिलेली रक्कम परत न दिल्याने शेवटी त्यांनी फसवणूकीची तक्रार दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.