‘ते’ विधान फक्त कार्यक्रमापुरते मर्यादित; देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार : आशिष शेलार यांचा ‘यू टर्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच आमचे उमेदवार राहतील. मराठा समाजातील कर्तृत्ववान महिला मुख्यमंत्री व्हावी, हे ‘ त्या ‘ कार्यक्रमात अगोदरच्या वक्त्याच्या विधानाला अनुषंगिक विधान केले होते, असे स्पष्ट करत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज ‘यू टर्न ‘ घेतला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी वरील स्पष्टीकरण केले. मुंबईमध्ये पत्रकार विजय चोरमारे लिखित मराठा समाजातील कर्तृत्ववान महिला या पुस्तकाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमास आशिष शेलार हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी आपल्या भाषणादरम्यान शेलार यांनी मराठा समाजातील कर्तृत्ववान महिलेने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, असे विधान केले होते. पवार यांच्या उपस्थितीत केलेल्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर शेलार यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, माझ्या भाषणा अगोदर ज्ञानेश महाराव यांचे भाषण झाले. त्या भाषणातील संदर्भाला अनुषंगून मी विधान केले. ते त्या कार्यक्रमापुरते संबंधित होते. देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.