चोरटा म्हणतो, चोरी करण्यासाठी श्रीमंतापेक्षा गरिबांची घरे चांगली

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – नागपुरात एक-दोन नव्हे तर तब्बल ९८ ठिकाणी चोऱ्या करून १५ वर्षे कारागृहात काढणारा आणि वर्धेत २० चोऱ्या केल्याची कबुली देणाऱ्या आरोपीने चोरी करण्यासाठी श्रीमंतांपेक्षा गरिबांची घरे चांगली असल्याचे सांगून पोलिसांना चक्रावून सोडले आहे. या चोरट्याला स्थानिक गुन्हेशाखेने बुधवारी रात्री अटक केली. चोरट्याचे नाव संजय मधुकर मून (५०, रा. बेला, जिल्हा नागपूर) असे आहे.

आरोपी संजयला तीन बायका आणि सहा मुले आहेत. संसाराचा गाडा ओढण्याकरिता तो चोऱ्या करतो. या व्यवसायाला २२ वर्षे झाले असून नागपुरात त्याच्याविरोधात ९८ गुन्हे दाखल असल्याचे तो सांगतो. चोरी करण्यासाठी निघण्यापूर्वी त्याची पत्नी त्याला डबा करून देते. प्रेस केलेले कपडे, पायात चांगली पादत्राणे, टॉपटीप राहणे हा त्याचा छंद. बुट्टीबोरी येथून रेल्वेत, बसने नियमित प्रवास करणाऱ्या कर्मचारी वर्गासोबत तो गप्पा हाकतो. सेवारत असल्याचा आव आणत वर्धा येथील सेवाग्राम रेल्वेस्थानक येण्यापूर्वी वरूड रेल्वेस्थानकावर उतरून तो चोरीसाठी एखादा घराचा शोध घेतो. श्रीमंतांपेक्षा गरीब वा मध्यमवर्गीय घरांमध्ये चोरी का ? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणतो, श्रीमंताच्या घरात काहीच मिळत नाही.

अनेकदा मला स्वत:च्या पैशाने परतीचा प्रवास करावा लागला. त्यापेक्षा गरिबाचे घर चांगले. तेथे सोन्या-चांदीच्या वस्तू व रोख हाती लागते. त्याने वर्धा जिल्ह्यात २० ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी १३ गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेली सर्व ठिकाणे त्याला माहीत आहेत. वर्धा शहरातून चोरलेला सर्व ऐवज नागपूर येथील तीन व्यापाऱ्यांना विकल्याची कबुलीही त्याने दिली. त्याला चोरी केल्याचा पश्चाताप नाही. पोटाची भूक भागविण्याकरिता मी चोरीचा मार्ग निवडल्याचे तो सांगतो. एवढ्यावरच न थांबता साहेब तुम्ही मला पकडल्याने माझा आगामी हंगाम गेला. अनेकांची घरे साफ होता-होता वाचली असे सांगायला तो विसरला नाही. वर्धा गुन्हे अन्वेषण विभागाला या अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल दोन महिने त्याचा पाठलाग करावा लागला. दोनदा त्याने पोलिसांची दिशाभूल करून डाव साधला पण बुधवारी रात्री तो जाळ्यात अडकला.