उत्तरप्रदेशातील कुंभमेळ्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूच्या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर हिंसा घडवून आणण्याची धमकी ईसिस या दहशतवादी संघटनेने दिली आहे. सोशल साईटवर ईसिसच्या एका हस्तकाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात पाण्यात विष कालवून समस्त हिंदूंची हत्या करू अशी धमकी तो देत असल्याचे दिसत आहे. यानंतर कुंभमेळ्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. केरळमधील अब्दुल रसीद याने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ असून तो आता युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यात कुंभमेळ्यात संपूर्ण हिंदूंना संपवण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहे.
हिंदू व मुस्लीमांमध्ये दुजाभाव करण्यात येत असून हिंदूंना आता लक्ष्य केलं जाणार आहे. कुंभमेळ्यातील पाण्यात विष कालवून सगळ्यांना मारून टाका असा आदेश एकजण देत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओबद्दल समजताच गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्या असून केरळमधूनच हा व्हिडीओ ऑपरेट करण्यात आल्याचे समोर आले आहे. मेळ्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांची नजर असून अनेकवेळा अशांतता निर्माण करण्यासाठी ईसिसचे दहशतवादी सोशल साईटवर जुना व्हिडीओ अपलोड करतात असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.