महेंद्रसिंह धोनीसह उरण मधील मोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उरण जवळील मोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आल्याचे समोर आले आहे. उरण जवळील खोपटा पुलावरील पिलरवर काही मजकूर लिहण्यात आले आहेत. यामध्ये उरणमधील काही मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली असून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
उरण जवळील खोपटा पुलाच्या पिलरवर लिहिलेल्या मजकुरातमध्ये इसिस, दहशदवादी अबू बकर अल बगदादी, हाफिज सईद, रहीम कटोरी आणि राम कोटोरी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच धोनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची नावे सांकेतिक स्वरुपात वापरण्यात आली आहे. याशिवाय पिलरवर लिहलेल्या मजकुरामध्ये जेएनपीटी, एअरपोर्ट आणि गॅस पेट्रोलच्या प्रकल्पांचे नकाशे काढण्यात आले आहेत.

तसेच त्यावर काही मजकूर लिहण्यात आला आहे. या ठिकाणी आणखी एक आकृती काढण्यात आली आहे. या आकृतीमध्ये कुर्ला, गोरखपूर, कुर्ला रेल्वे मार्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.पोलिसांना हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान हा मजकूर कोणी लिहला आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, पोलिसांनी या ठिकाणची पाहणी केली असता या ठिकाणी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. रात्रीच्यावेळी या ठिकाणी काही मद्यपी दारु पित बसत असल्याने त्यांची देखील चौकशी सुरु केली आहे. हा परिसर संवेदनशील असून अमेरिकेने अटक केलेला दहशतवादी डेव्हीड हेडली याने चौकशीत आपण उरण येथील एलीफंडा क्वीजची आणि या ठिकाणच्या महत्वाच्या प्रकल्पांची रेकी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे या घटनेला गांभीर्य़ाने घेऊन पोलिसांनी युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे.

हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान या घटनेची माहिती ग्रमास्थांना मिळाल्याने या हा मजकूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तसेच काहींनी याचे फोटो काढून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.