भोंदूबाबाचा सल्ला भोवला ; तरुणाच्या पोटात गेला टूथब्रश 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – आजवर रुग्णाच्या पोटातून केसांचा पुंजका तसेच खिळा काढल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. माणसाच्या पोटात काय निघेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. डाॅक्टरांनी तरुणाच्या पोटातून टूथब्रश बाहेर काढला आहे. दिल्‍लीतील एम्स रुग्णालयात पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या तरुणाची ही कथा आहे. याशिवाय दात घासायचा टूथब्रश पोटात गेलाच कसा, असा प्रश्‍न डॉक्टरांनी तरुणाला केला. यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून त्याच्या घरातल्यांसह सारेच चक्रावले.

आबिद असे या तरुणाचे नाव आहे. आबिदला वरचेवर पोटदुखीचा त्रास व्हायचा. अनेक उपचार करूनही पोटदुखी बरी होत नसल्याने तो वैतागला होता. त्याचवेळी एकाने त्याला ही पिशाचबाधा किंवा करणी असावी, असे सांगत एका बाबा कडे जाण्याचा सल्‍ला दिला. पोटदुखीने त्रस्त असल्याने आबिदने लगेचच या भोंदूबाबाला गाठले. बाबाने त्याला तुझ्यावर शत्रूंनी जादूटोणा केल्याचे सांगत टूथब्रशने घसा साफ करण्याचा भन्‍नाट सल्ला दिला.

बाबाचा सल्ला त्वरीत आमलात आणण्याचा निर्णय त्याने घेतला.  एकविसाव्या शतकातील या तरुण महाभागानेही कसलाही विचार न करता टूथब्रशने आपला घसा साफ करण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नात हा टूथब्रश थेट त्याच्या पोटात गेला होता. एम्समध्ये एन्डोस्कोपी करून त्याच्या पोटातून हा टूथब्रश बाहेर काढण्यात आला. ही घटना ऐकून त्याच्या घरातल्यांसह डाॅक्टरही चकित झाले.

You might also like