१५०० रुपयांची लाच स्विकारताना अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गतचा २० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी १५०० हजार रुपयांची लाच स्विकारताना उमरगा तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनास अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) संजय गांधी निराधार योजना विभागात करण्यात आली.

तक्रारदार यांच्या आत्याच्या नावे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रूपयांचा धनादेश आला होता. हा धनादेश मिळावा, यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी चकरा मारल्या असता, तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन संजय बबनराव शिंदे यांनी पैशाची मागणी केली. सदरील प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

संबंधित तक्रारीची शहानिशा केली असता, तथ्य आढळून आले. यानंतर १३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागामध्ये सापळा लावला. यावेळी अव्वल कारकुन संजय शिंदे यास तक्रारदाराकडून १५०० रूपये स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस उपाधिक्षक बी.व्ही. गावडे हे करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.