डांगे चौकातील वाहतूक कोंडीची समस्या संपणार 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – आयटी पार्कसाठी जाण्यासाठी आणि येण्यासाठी असणाऱ्या डांगे चौकातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच असते. वाहतूक विभागाचे पोलीस वेगवेगळ्या योजना राबवून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र यावर कायमचा तोडगा निघण्याचे चित्र दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डांगे चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 17 कोटी 96 लाख 94 हजार रुपये खर्च येणार आहे. ग्रेडसेपरेटर झाल्यास चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

महापालिकेतर्फे थेरगाव, डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाची 24 कोटी 71 लाख रुपयांची निविदा 12 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा प्रक्रियेत टी. अ‍ॅन्ड टी इन्फ्रा (16 कोटी 54 लाख), व्ही. एम. मातेरे इन्फ्रा (16 कोटी 75 लाख) आणि कुष्णाई इन्फ्रा प्रा. लि (17 कोटी) यांनी सहभाग घेतला. 5 नोव्हेंबर 2018 रोजी ही निविदा उघडण्यात आली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी टी. अ‍ॅन्ड टी इन्फ्रा यांना 26 डिसेंबर 2018 रोजी कंत्राट दर कमी करण्याची लेखी विचारणा केली. 3 एप्रिल 2018 रोजी या ठेकेदाराने कंत्राटाचा सुधारित दर सादर केला.

त्यात बांधकाम खर्च 16 कोटी 54 लाख 10 हजार रुपये, टेस्टिंग चार्जेस, डिझाईन चार्जेस, रॉयल्टी चार्जेस यासह कंत्राटदाराने 17 कोटी 96 लाख 94 हजार दर निश्चित केला. या खर्चाला मान्यता देण्याचा देण्याचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आयत्यावेळचा प्रस्ताव अखरेच्या म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत मांडला. त्यास मान्यता देण्यात आली.

चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, भोसरी या भागात राहणारे नागरिक आयटीपार्क आणि परिसरात जाण्यासाठी सांगवी किवळे बीआरटीरोड चा वापर करतात. त्यामुळे हा सर्वात जास्त बस वाहतूक होणारा रस्ता आहे. नागरिकांची संख्या जास्त असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चौकांमध्ये सिग्नलची वेळ देखील वाढली आहे. विशेषतः डांगे चौकात सर्वात जास्त त्रास होतो. याबाबत स्थानिक नागरिक डांगे चौकातील अडचणींबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत आहेत.