गोमांस तस्करांकडून पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – कत्तल केलेल्या जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना गोमांस तस्करांनी पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी पळून जाणाऱ्या वाहनचालकाला अटक केली असून गाडीमध्ये ६०० किलो मास आढळून आले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.२९) घडला. पोलिसांनी शाहीद सलीम इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे हे गुरुवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्यासह सरकारी वाहनाने वाहनचालक बाळशीराम भवारी व पोलीस मित्रासमवेत गस्त घालत होते. या वेळी जुन्नरमधील मध्य वस्तीतील पणसुबा पेठ येथील सौदागर मशिदीजवळ त्यांना संशयास्पदरीत्या जात असलेले एक वाहन दिसले. त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र त्या वेळी चालकाने वेगाने आपली गाडी रस्त्यावर उभे असलेले पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या अंगावर घातली. या वेळी प्रसंगावधान राखून नलावडे व त्यांचे कर्मचारी बाजूला सरकले. यामुळे त्यांचा जीव वाचला. वाहनचालकाने पोलिसांच्या गाडीला जोरात धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अवैधरीत्या कत्तल केलेल्या जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळले.

वाहनचालक इनामदार याने दिलेल्या माहितीनुसार, नोमान कुरेशी, मजहर कुरेशी, अतिक बेपारी, नाजीम बेपारी, जिकरान कुरेशी, बाबा कुरेशी (सर्व जण रा. खलीलपुरा, जुन्नर) यांनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करून हे गोमांस वाहतुकीसाठी इनामदारकडे दिले असल्याचे समजते.

पोलिसांनी गोवंशहत्या, भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल केलेला असून शाहीद इनामदार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे हे करीत आहेत.

२ हजाराच्या नव्या नोटा बंद होणार ?