आश्चर्य ! म्हणे झाडे ऐकतात, प्रतिसादही देतात, इस्रायली संशोधकांचा दावा

जेरुसलेम : पोलीसनामा ऑनलाइन – बहुतांश वेळा आपण विविध बागांमध्ये माळ्यांना विविध फूल व फळाझाडांसोबत गप्पा मारताना पाहतो. झाडांसोबत बोलत असल्याचे पाहून अनेक जण त्यांना मूर्खात काढतात; पण वनस्पतींमध्येदेखील आवाज ऐकण्याची क्षमता आहे. इतकेच नाही, तर ते प्रतिसादही देतात, असा दावा इस्रायलच्या वैज्ञानिकांनी नवीन संशोधनाद्वारे केला आहे.

इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यानुसार वनस्पतीदेखील आवाज ऐकण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. फुले मधमाशांच्या घोंगावत येण्याचा आवाज ऐकू शकतात. उल्लेखनीय म्हणजे मधमाशा आल्यानंतर त्यांना मधाळ रस पुरवत ते प्रतिसादही देतात. अधिकाधिक मधमाशांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी फुलांद्वारे ही पद्धत वापरली जाते. या माध्यमातून संबंधित फुलझाडांचे परागकण दूरपर्यंत पसरत जातात. आपले परागकण दूरपर्यंत जावे, या उद्देशाने फुले मधमाशांचा आवाज ऐकून मधाळ रस पुरवत असतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

यासाठी त्यांनी एक प्रयोगही केला आहे. संशोधकांनी संध्याकाळच्या सुमारास फुलझाडांच्या परिसरात रेकॉर्डिंग केलेला मधमाशांचा घोंगावण्याचा आवाज वाजविला. यानंतर फुलांच्या मधाळ रसामध्ये फक्त तीन मिनिटांमध्ये सरासरी २० टक्के वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे फुलझाडेदेखील आवाज ऐकत असल्याचे पुरावे प्रथमच समोर आले आहेत. यासंबंधीचे सविस्तर संशोधन ‘बायोरिझिव्ह’ नामक संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे.