क्रिकेटच्या टी-20 सामन्यातील विजयाचा जल्लोष ‘भोवला’; जि.प. सदस्यासह 15 जणांवर ‘सोशल डिस्टन्स’चे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल

शिक्रापुर : शिरूर तालुक्याच्या वढू बुद्रुक येथे सुरु असलेल्या धर्मवीर संभाजी राजे करंडक २०२१ स्पर्धेच्या दरम्यान विजयी संघाने अंतिम विजयानंतर डीजे वाजवून विना मास्क आनंदोस्तव साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे यांच्या सह तब्बल पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसर वढू बुद्रुक ता. शिरूर येथे सुरु असलेल्या धर्मवीर संभाजी राजे करंडक २०२१ स्पर्धा सुरु असताना आयोजकांनी शेवटचा सामना हा भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब पाबळ व घनोबा स्पोर्ट्स क्लब धानोरे यांच्यात खेळविला असताना पाबळ येथील भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब पाबळ या संघ विजयी झाला. यावेळी विजयी संघाचे संघमालक विकासनाना गायकवाड यांनी विजयीसंघासह त्या ठिकाणी डीजे वाजवून आनंदोत्सव साजरा केला .यावेळी या संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे यावेळी उपस्थित झाल्या होत्या.

यावेळी येथे कोणीही मास्क लावलेले नव्हते. तसेच गर्दी केलेली होती, येथे सर्वांनी विना मास्क आनंदोस्तव साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे यांच्या सह तब्बल पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे करत आहे.