ट्रक थेट शिरला घरात; दोघांना चिरडले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – गिट्टी भरलेला हायवा ट्रक थेट घरात शिरला. खाटेवर गाढ झोपेत असलेल्या दोघांना त्याने चिरडले असून त्यात दोघांचा झोपेतच मृत्यू झाला. ही घटना प्रजासत्ताक दिनी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे घडली. उमाजी तिवाडे (वय ४०) व देविदास वासुदेव झगडकर (वय ४५) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी रास्ता रोको केला आहे.

याबाबतची माहिती अशी, शेतीच्या कामासाठी देविदास व उमाजी हे चेकठाणा येथे आले होते. उशीर झाल्याने ते चेकठाणा येथील नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी थांबले होते. सोनटक्के यांचे घर बसस्थानक परिसरात आहे. दोघांनी सोनटक्के यांच्या परिवारासोबत भोजन घेतले. त्यानंतर पहिल्या खोलीत झगडकर व तिवाडे झोपले होते. तर, दुसऱ्या खोलीत सोनटक्के कुटुंब झोपले होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नंदोरी येथून गिट्टीने भरलेला ट्रक भरधाव विठ्ठलवाडाकडे जात होता. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तो ट्रक थेट सोनटक्के यांच्या पत्र्याच्या घरात शिरला. त्याने भिंत फोडून खाटवर झोपलेल्या दोघांना धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा –