Pimpri News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी चोरले तब्बल 26 महागडे स्मार्ट फोन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर तिचा फोन बदलून देयचा. तिच्याकडून जुना फोन घेऊन त्याची विक्री करुन मिळालेल्या पैशांमधून मौजमजा करणाऱ्या दोघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. या दोघांनी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाइल चोरी करण्याचा सपाटा लावला होता. अखेर त्यांच्या मुसक्या आवळून 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

सागर मोहन सावळे (वय-22 रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), निलेश देवानंद भालेराव (वय-19 रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई भोसरी येथील पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाचे खाली करण्यात आली. पोलिसांनी तब्बल सहा तास सापळा रचून आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाखाली दोन तरुण होंडा शाईन (एमएच 14 एचबी 3909) वरुन येणार आहेत. या दोघांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे असलेली दुचाकी त्यांनी सोमवारी (दि.11) पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे स्पष्ट झाले. आरोपींची अंगझडती घेतली असता 8 मोबाईल मिळून आले. पोलिसांनी दुचाकी आणि मोबाइल जप्त करुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यात पोलिसांना वेगवेगळ्या कंपन्यांचे 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी असा एकूण 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी सागर आणि निलेश यांच्या प्रेयसीला स्मार्ट फोनचे आकर्षण होते. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी मोबाइल चोरी केली. चोरलेले मोबाइल प्रेयसीला देत होते. काही दिवसांनी मोबाइल चोरून तो प्रेयसीला वापरण्यास देऊन पहिला फोन काढून घेयचा. त्या फोनची विक्री करुन त्यातून मिळालेल्या पैशावर मौजमजा करायची, मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. आरोपींनी तब्बल 26 स्मार्ट फोन चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी पिंपरी -3, भोसरी एमआयडीसी -2, भोसरी – 3 आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, प्रविण माने, राजेश कौशल्य व गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.