बीडमध्ये चुलत्यानं पुतण्याच्या पोटात खुपसला चाकू, जखमीची प्रकृती गंभीर, शहरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  डोक्यात दगड घालून अन् पोटात चाकुचे वार करून चुलत्यानेच पुतण्यावर खुनी हल्ला केल्याची घटना आज पहाटे माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे घडली असून ज्या चुलत्याने हा हल्ला केला तो मनोरूग्ण असल्याचे समजते.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्‍वर महादेव मोरे (वय 33, रा.कारी ता.धारूर) हा काल माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे मावशीच्या घरी गेला होता. परतण्यास उशिर होत असल्यामुळे तो मावशीच्या घरीच थांबला. रात्री मावशीसोबत चर्चा करताना ज्ञानेश्‍वर याने चुलत्याला पुन्हा येरवड्याला पाठवावे लागेल अशी चर्चा केली. विशेष म्हणजे यापुर्वी देखिल चुलत्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवत असल्यामुळे येरवडा येथे दाखल केले होते परंतु रात्री मावशीसोबत होत असलेली ज्ञानेश्‍वरची चर्चा चुलत्यानेच ऐकली व पुन्हा मला येरवड्याला पाठविण्याची तयारी सुरू केली असल्यामुळे लक्षात आल्यामुळे पहाटे उठून अगोदर ज्ञानेश्‍वरच्या डोक्यात दगड घातला व त्यानंतर चाकु पोटात मारला.

मावशीने आरडाओरड केल्यानंतर ज्ञानेश्‍वरचा चुलता चाकु घेवून पळून गेला. रक्तबंभाळ झालेल्या ज्ञानेश्‍वरवर माजलगाव येथील ग्रामिण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सकाळी 10 वाजता बीड येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ज्ञानेश्‍वरची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन थेटरमध्ये घेतले. चाकुचा वार आतड्यांना लागल्यामुळे तीन आतडे तुटल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. पोटात मोठा रक्तस्त्राव झालेला असल्यामुळे रूग्णाला वाचविणे व शस्त्रक्रिया यशस्वी करणे हे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. पोटात जमा झालेले मोठ्या प्रमाणावर रक्त डॉक्टरांनी बाहेर काढून शस्त्रक्रिया केली. डॉ.माजेद, डॉ.सदाशिव राऊत, भुलतज्ञ डॉ.तांदळे, डॉ.मोराळे, डॉ.शाफे आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. सध्या ज्ञानेश्‍वरची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.