अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बंगलुरुला आणलं, कर्नाटक पोलिसांच्या दिलं ताब्यात

बंगलुरु : वृत्त संस्था – रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. त्याला सेनेगल येथून रविवारी सायंकाळी दिल्ली येथे आणण्यात आले. त्यानंतर सोमवारी पहाटे त्याला बंगलुरु येथे आणण्यात आले. अतिशय कडेकोट बंदोबस्तात त्याला विमानतळावरुन अज्ञात ठिकाणी पोलीस घेऊन गेले.

रवी पुजारी याला सेनेगलला ताब्यात घेतल्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले. त्यानंतर त्याला घेऊन भारतीय अधिकारी फ्रॉन्समार्गे दिल्ली येथे घेऊन आले. त्यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे बंगलुरुला आणण्यात आले आहे.

पुजारी याला यापूर्वीही भारतात आणण्याचे प्रयत्न झाले होते. गेल्या वर्षी त्याला अटक केल्यानंतर त्याने प्रत्यापर्णास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला होता. तेथे पुजारी हा अँथनी फर्नाडिस या नावाने वावरत होता. त्याच्याकडे बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट होता.

गेल्या ८ वर्षात पुजारीने सेनेगल, बुर्किना फासो येथे नमस्ते इंडिया नावाने अनेक रेस्टाँरंट उभारली. डकारमध्ये जवळपास एक दशकापासून तो पत्नी व मुलांसह रहात होता. सध्या तो कर्नाटक पोलिसांच्या कस्टडीत राहणार आहे. त्यांच्याकडील गुन्ह्यांचा तपास झाल्यानंतर त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या मागणीनुसार मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात येऊ शकते.

रवी पुजारी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तब्बल ९८ गुन्हे दाखल आहेत. भारतीय तपास यंत्रणांच्या इनपुटवरुन रवी पुजारी याला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगलमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याने तो फरार झाला होता. मात्र, सेनेगलमध्येच रहात होता. भारतीय एजन्सी त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून होती. रवी पुजारीने बॉलिवूड स्टार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना धमक्या दिल्या होत्या. कर्नाटक पोलिसांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवल्याने रवी पुजारी याला पुन्हा अटक करण्यात यश आले आहे.