शालेय साहित्यातून साकारली भारतीय जवानाची अप्रतिम कलाकृती      

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पेन्सिल, खोडरबर, पट्टी, टोकयंत्र अशा शालेय वस्तूंचा वापर करून भारतीय जवानाची सुरेख कलाकृती साकारली आहे. ‘मैत्र जीवा’चे या चित्रप्रदर्शनातून दहा बाय बारा फूट आकाराच्या जवानाची कलाकृती साकारून जवानांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. जवानांप्रती असलेला आदर, अभिमान,राष्ट्रप्रेम यातुन व्यक्त होताना दिसतो.

कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे ‘मैत्र जीवा’चे या चित्रप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सोमवार ३० एप्रिल पर्यंत सकाळी १० ते ९ या वेळेत पुणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. संस्थेचे संचालक अमोल काळे आणि स्वामिनी कुलकर्णी, नचिकेत दामले, वैदेही मालशे, राजेश आपटे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील कलाकृती व इतर चित्रे साकारली आहेत.

या संस्थेतर्फे या कलाकृतीसाठी वापरण्यात आलेले शालेय साहित्य संस्थेत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि परिचयातील लोकांनी दिले आहे. हे साहित्य अहमदनगर येथील स्नेहालय या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे.  संस्थेतर्फे प्रदर्शनात विविध प्रकारची चित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये साडे तीन हजार शालेय वस्तूंचा वापर करून वीस विद्यार्थ्यांनी ही जवानाची कलाकृती साकारली आहे. तसेच पुण्यातील गणेश मंडळांचे गणपती, गडकिल्ले, नावाजलेल्या व्यक्तींचे गुरु, राष्ट्रपुरुष, बारा बलुतेदार, लोक कलावंत, धाग्यांपासून बनविलेली चित्रे, रददीच्या कागदापासून बनविलेल्या वस्तू अशी अनेक रेखीव आणि आकर्षक चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

या प्रदर्शनाविषयी बोलताना अमोल काळे म्हणाले,”भारताबद्दलचा आणि आपल्या जवानांबद्दल असलेला अभिमान,आदर, प्रेम विद्यार्थ्यांमध्ये रुजावा ज्याच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत तो भारतीय जवानच ख-या अर्थाने आपल्या जीवाचा मित्र आहे, त्याच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. जीवनात सैनिक आणि शेतकरी यांच्याप्रती नेहमी आदर असावा, या भावनेने ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या कलाकृतीसाठी १००० वह्या, १५०० पेन्सिल आणि इतर शालेय साहित्य यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच प्रदर्शनात विविध प्रकारची ५० विद्यार्थ्यांनी काढलेली ५०० पेक्षा अधिक चित्रे मांडण्यात आली आहेत. ही चित्रे ४ ते ६० या वयोगटातील विद्यार्थ्यांनी काढली आहेत.”