जप्त वाळू वाहने तहसील कार्यालयासमोरून चोरली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पकडलेले २ डंपर, १ ट्रॅक्टर चोरून नेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेली वाहने चोरून राहुरीतील वाळूतस्करांनी महसूल व पोलिस प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे.

गौण खनिज विभागातील लिपिकाच्या फिर्यादीवरून अविनाश भिंगारदे (रा.डिग्रस, ता.राहुरी) व भारत शेंडगे (रा.राहुरी खुर्द, ता.राहुरी) या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुरीत महसूल पथकाने पकडलेली तीन वाहने लांबविल्याचे घटनेने मोठी खळबळ उडाली होती. २५ फेब्रुवारी रोजी रात्री महसूल विभागाच्या पथकाने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन डंपर व एक ट्रॅक्टर पकडला होता. ही वाहने जप्त करून राहुरी पोलीस तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली होती. रात्रीच्या वेळी कोणीतरी ही वाहने चोरून नेली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार महसूल विभागाच्या निदर्शनास आला. मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता महसूल प्रशासन मूग गिळून गप्प होते. या घटनेची माहिती पसरल्यानंतर याबाबत ‘पोलीसनामा‘ला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तातडीने गौण खनिज विभागाच्या लिपिकाने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी गेल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी पोलिस व महसूल प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.