शहरातील नो पार्किंग मधील वाहने आता हायड्रोलिकने उचलण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात नो पार्किंगमध्ये केलेली वाहने वाहतुक शाखेचे कर्मचारी उचलत होते. त्यावेळी टोळधाडीप्रमाणे आलेले कर्मचारी अत्यंत घाई गडबडीने ही वाहने उचलून नेत असल्याने त्यात वाहनांचे नुकसान होत होते. त्यामुळे आता वाहतुक शाखेक़डून ही वाहने उचलण्यासाठी यांत्रिक पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे नो एन्ट्रीत वाहने पार्क करणाऱ्यांना आता मोठा भूर्दंड बसणार आहे. यासाठी पुणे पोलिसांनी निवादा काढली असून नागपूर स्थित कंपनीसोबत हायड्रोलिक यंत्राने वाहने उचलण्यासाठी करार करण्यात येणार आहे.

शहरातील वाढती वाहनसंख्या, चिंचोळे रस्ते आणि त्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगसाठी असलेली अपुरी जागा यामुळे वाहने पार्क करण्याचा बिकट प्रश्न पुण्यात निर्माण झालेला आहे. वाहतुकीच्या इतर समस्यांसोबत पुण्यात पार्किंगसाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे घाई गडबडीत आलेला पुणेकर आपली दुचाकी, चारचाकी नो पार्किंग झोनमध्ये पार्क करतो. त्यावेळी या नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनामुळे वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे शहर वाहतुक शाखेचे पोलीस टेम्पोमध्ये ही वाहने उचलून आपापल्या विभागात घेऊन जातात. त्यावेळी टोळधाड यावी तशी ही वाहने कर्मचाऱ्यांकडून उचलली जात होती. यात अनेकदा वाहनांच्या नुकसानीची तमा न बाळगता निष्काळजीपणाने वाहने उचलली जातात. यात वाहनांचे प्रचंड नुकसानही होत होते. त्यावरून नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद होत होते. त्यामुळे वाहतुक शाखेकडे अनेकदा तक्रारी केल्या जात होत्या.

हे प्रकार टाळण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहेत. त्यासाठीच्या निविदेला मंजूरी देण्यात आली असून असून याबाबतचा करार नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक कंपनीसोबत करण्यात येणार आहे.

वाहतुक शाखेत मंगळवारी हायड्रॉलिक पद्धतीने वाहने उचलण्याचे प्रात्यक्षिक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख अन्य अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले.

मुंबईच्या धर्तीवर पुण्यात ही यंत्रणा राबविली जाणार आहे. गृह विभागाच्या आदेशाप्रमाणे यांत्रिक पद्धतीने वाहने उचलण्यासाठी एक वर्षापुर्वीच निविदा काढण्यात आली आहे. संबंधित कंपनीसोबत यासंदर्भातील करार झाल्यानंतर पद्धती कार्यान्वित केली जाईल. सध्या प्रत्येक वाहनाला ५० रुपये टोईंग चार्ज लावला जातो. तो यापुढे वेगळा असेल.

दुचाकी टोईंग चार्ज – २०० रुपये

दंड – २०० रुपये

जीएसटी – ३६ रुपये

एकूण – ४३६ रुपये

तर चारचाकीसाठी

टोऊंग चार्जेस – ४०० रुपये,

दंड – २०० रुपये

जीएसटी – ७२

एकूण – ६७२

मुंबईत सध्या ८० वाहने कार्यरत आहेत. तर पुणे शहरात ३५ क्रेन आणि चारचाकींसाठी १० क्रेन आणल्या जाणार आहेत. अशी माहिती विदर्भ इन्फोटेकचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत गंगथडे यांनी सांगितले. या क्रेनवर दोन कर्मचारी असतील. वाहतुक शाखेचा कर्मचारी सांगेल ते वाहन कर्मचारी हॅंडल व मागील बाजूला पट्टा बांधून क्रेनच्या साह्याने उचलणार आहेत. यामध्ये माणसांनी वाहन उचलताना व ते टेम्पोत चढविताना येणारी मर्यादा व नुकसान टाळले जाते. एक क्रेन एका वेळी ७ ते ८ वाहने उचलू शकते. शहरात सध्या १० टेम्पोने वाहने उचलली जातात. वाहनांच्या संख्येच्या प्रमाणात ते प्रमाण खूप कमी आहे.

You might also like