धक्कादायक…..अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले

चतराः (झारखंड) वृत्तसंस्था

कठुअा, उना, आणि सुरत येथील बलात्काराच्या घटनांनी देश हादरलेला असताना आणखी एक मानुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेतील नराधमांचे क्रौर्य ऐकून तुमच्या जिवाचा देखील थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील चतरा जिल्ह्यात घडली आहे. पीडित मुलीसोबत काय झाले आहे हे समजताच गावातील पंचांनी बैठक बोलावली आणि या घटनेतील दोषींना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. दंड ठोठावल्याचा राग मनात धरून या नराधमांनी थेट पीडित मुलीचे घर गाठले व तिच्या घरात बळजबरीने घुसले आणि तिला जाळून ठार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 8 वीत शिकत होती. छतरा या ठिकाणच्या राजा केंदुअा गावात ही घटना घडली. सदरची घटना घडल्यानंतर पंचानी अारोपींना जो दंड ठोठावण्यात आला त्याचा राग मनात धरुन या नराधमांनी मुलीच्या घरात घुसून आई वडिलांना मारहाण करत तिला जिवंत जाळले.

पीडित मुलगी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेली होती. तिथून परत येत असताना तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास ही मुलगी रडत घरी आली आणि तिने आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकर सांगितला. घडलेल्या घटनेची माहिती मुलीच्या आई वडिलांनी पंचाना सांगून पंचायतीत दाद मागितली. घटनेची दखल घेत शुक्रवारी पंचांनी पंचायत बोलावली आणि सगळ्या नराधमांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. हाच राग मनात धरून या नराधमांनी पीडित मुलीला जिवंत जाळले.

सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नराधमांना अटक करण्यात आली आहे.