बळीराजाला पेरणीसाठी आठ दिवस वाट पाहावी लागणार 

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

मान्सून दाखल होऊन आठ दिवस उलटले मात्र त्यांनतर पावसाने उसंत घेतली आहे. राज्यात चांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात पाऊस झाला असला तरी, पावसाने आणखीही राज्यातील काही भागात हजेरी लावलेली नाही.

राज्यभर मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा मान्सून वेळेत दाखल झाला तरी त्याचा जोर आठवड्याच्या आताच ओसरला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सामान्यत: 15 जूनपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात मान्सून दाखल झालेला असतो. परंतु 11 जून पासून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणखी काहीदिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

कोकणात तुरळक पावसाची शक्यता आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात आठ दिवस तरी पाऊस होणार नसल्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.