पवारांची नजर असणारा ‘हा’ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच 

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणी करत असलेला वर्धा काँग्रेसकडून काढून स्वाभिमानीला द्यायचा आणि स्वाभिमानीला आघाडीत घ्यायचे अशी रणनीती शरद पवार यांनी आखली होती. मात्र काँग्रेसचे अहमदनगरमध्ये लढण्या आधीच झालेले पानिपत पाहता शरद पवारांच्या मनसुब्याला काँग्रेसने होकार भरला नाही. अशा सर्व पार्श्वभूमीवर आज मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात वर्ध्याच्या जागी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने महाराष्ट्राच्या काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष  प्रभा राव यांच्या मुलीला म्हणजे चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली आहे. स्वाभिमानीला मतदारसंघ सोडण्याच्या बाबत चर्चा सुरु असताना चारुलता टोकस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्या म्हणाल्या होत्या की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मला तयारी करायला सांगितले आहे. तसेच काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानीला वर्ध्याची जागा सोडणार नाही असा विश्वास  चारुलता टोकस यांनी व्यक्त केला होता.

बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार तसेच प्रभा राव आणि शरद पवार हे राजकीय वैर महाराष्ट्रातील सर्व राजकीय जाणकारांना माहित आहे. म्हणूनच अहमदनगर आणि वर्धा मतदारसंघाच्या उमेदवारी वरून शरद पवार यांनी आपले जुने राजकीय वैर पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचे मनसुबे सर्वच पातळीवर यशस्वी होत नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने दाखवून दिले आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी आघाडी सोबत राहणार असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे त्यांची तीन जागांची मागणी दोन जागांवर संपुष्ठात आणून स्वाभिमानीला आघाडीत सामावून घ्यायचे अशी तयारी दोन्ही काँग्रेसने केली आहे. स्वाभिमानीला वर्ध्याच्या बदल्यात सांगली देण्याचे नियोजन काँग्रेस आघाडीने केले असल्याचे देखील समजते आहे.