पुणे महापालिकेसमोर होतीय पाणी गळती, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे पुणे शहरात पाणी कपात सुरु असताना मात्र पुणे महापालिकेच्या समोर ३ ते ४ दिवसांपासून पाणी गळती सुरु आहे. या पाणी गळतीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या बुडाखालीच अंधार म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.

पुणे शहराला दररोज १३५० एमएलडी पाण्याची गरज असताना शहराला ६५० एमएलडी एवढा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणि टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना पालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या बिल्डिंगसमोर मेट्रोनेचे काम करण्यासाठी खड्डा खणण्यात आला आहे. या खड्ड्यातून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन मधून पाणी गळती होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ही पाणी गळती सुरु असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. असे असताना देखील पालिकेतील अधिकाऱ्यांना याची माहिती नाही.

एकीकडे पाणी कपातीला विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष देखील याविषयी काही बोलण्यास तयार नाहीत. पाणी कपात कमी करा म्हणून ओरडणाऱ्या लोकप्रतिनीधींना पालिकेसमोर होणारी पाणी गळती दिसत नाही का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी शहरी आमदारांकडून पाणीकपातील विरोध केला जात आहे.

तर शेतकऱ्यांच्या वाट्याचे त्यांना द्यावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका ग्रामीण भागातील आमदारांनी घेतली आहे. सामोपचाराने प्रश्न सोडविण्याऐवजी दोन्ही भागातील आमदार पाण्यावरून भिडलेले दिसून येत आहेत. शेतकरी संघटनाही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यातच अशा प्रकारे पाणी गळती होत असल्याने येत्या पुढील काळात पुणेकरांसह ग्रामिण भागातील जनतेलाही पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.