पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर आता ‘सी वॉच’ची नजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरातील मोठा आणि सर्वात गजबजलेला असणारा लक्ष्मी रस्ता आता सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मी रोडवरील कापड दुकानदारांची बैठक पार पडली. यामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील सर्व कापड व्यवसायिक आपापल्या दुकाना बाहेर सीसीटीव्ही लावतील असे आश्वासन व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

पुण्यातील अतीमहत्त्वाच्या रस्त्यापैकी लक्ष्मी रोड हा एक आहे. या रस्त्यावर अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या रस्त्याला ऐतिहासीक पार्श्वभूमी देखील आहे. याच रस्त्यावरून पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असते. हा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याने या रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. या रस्त्यावर हजारो लोक खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून ‘सी वॉच’ हा प्रकल्प राबण्यात येत आहे.

आज झालेल्या व्यावसायिकांच्या बैठकीमध्ये सीसीटीव्हीमुळे उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. तसेच सीसीटीव्हीमुळे हरवलेल्या वस्तू सापडल्याची माहिती व्यापाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील व्यवसायिकांनी आपापल्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावावेत असे आवाहन करण्यात आले. सीसीटीव्ही मुळे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे किंवा संशयिताला पकडता येणार आहे. आत्तापर्य़ंत लक्ष्मी रस्त्यावर २७ हजार सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राहुल बोरा, राज भंडारी, अजित पटेल, राजेश शेरवानी, जयेश कासट आदी उपस्थित होते. तसेच फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कलगुटकर हजर होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like