दुर्देवी ! संपुर्ण गाव बघ्याच्या भुमिकेत होतं अन् ‘ती’ पतीचा मृतदेह हातगाडीवर…

पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक मधील अथणी गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणी पुढे आलं नाही, म्हणून पत्नीनेच हातगाडीवर पतीचा मृतदेह टाकून स्मशानभूमीत नेल्याची घटना समोर आली आहे.

अथणी परिसरातील सदाशिव हिरट्टी (वय ५५) यांचा रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याची माहिती शेजारी असलेल्यांना आणि नातेवाईकांना समजली. मग शेजारी व नातेवाईक हिरट्टी यांच्या घरी पोहचले. मात्र, घरात कुणी प्रवेश केला नाही. कोरोना संसर्गामुळे सदाशिव हिरट्टी यांचा मृत्यू झाल्याच्या संशयावरुन सर्वांनी लांबूनच अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. पण सदाशिव यांचा मृतदेह घरातच राहिला. तेव्हा पतीच्या मृत्यूमुळे आधीच दुःखात असलेल्या पत्नीला या प्रकारामुळे काय करावे काही सुचेना. त्यांनी नागरिकांना विनंती केली, मात्र कुणीही पुढे येण्यास तयार होईना.

शेवटी पत्नीने मनाशी निर्धार करुन पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. मग जाऊन एक हातगाडी आणली आणि हातगाडीवर त्या दुःखी पत्नीने मृतदेह उचलून ठेवला. त्यानंतर गावातील रस्त्यावरुन हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. गावातील सगळे लोक बघत राहिले मात्र एक सुद्धा त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीस धावून गेलं नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.