पहिल्या पतीची दुचाकी चोरणारी पत्नी तिच्या दुसऱ्या पतीसह गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नानंतर पतीसोबत पटत नसल्याने त्याला सोडून देऊन दुसरे लग्न करणाऱ्या महिलेला पहिल्या पतीच्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दुसऱ्या पतीसह अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने ढोले पाटील रोडवर करण्यात आली.

अमित सुनिल कागडा (वय-२३), दिशा अमित कागडा (वय-२३ दोघे रा. रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे.

गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस ढोले पाटील रोडवर गस्त घालत असताना पोलिसांना एका दुचाकीचा संशय आला. पोलिसांनी दुचाकी थांबवून अमित कागडा याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्यांनी कागदपत्र जवळ नसल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांना कर्यालयात आणून सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याची माहिती दोघांनी दिली. दुचाकीचा मुळ नंबर एमएच १४ जीपी २९२८ असून आरोपींनी यामध्ये छेडछाड करून एमएच १२ व्हीएस ५८४१ नंबर टाकून दुचाकी वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दिशा कागडा हिच्याकडे चौकशी केली असता, पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने तिने अमित सोबत दोन वर्षांपूर्व लग्न केले. पहिल्या पतीला सोडून देताना तिने पतीची दुचाकी चोरून आणली. दुचाकीचा नंबर बदलून वापरत होते. पोलिसांनी दोघांना अटक करून ३५ हजार रुपयांची दुचाकी जप्त केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस करर्मचारी दत्तात्रय गरुड, संतोष क्षिरसागर, गजानन गाणबोटे, मच्छिंद्र वाळके, अतुल साठे यांच्या पथकाने केली.