Pimpri News : जन्म दिलेल्या बालकासोबत महिलेने केले ‘असे’ कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ बेवारसपणे एका रिक्षात टाकून पळ काढणाऱ्या महिलेला पिंपरी पोलिसांनी काही तासात ताब्यात घेतले. महिलेने महापालिकेच्या स्वच्छतागृहात रात्रीच्यावेळी बाळाला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी तिने बाळ रिक्षात ठेवले. हा प्रकार मोरवाडी येथे उघडकीस आला असून पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक बेवारसपणे अज्ञातांनी टाकून दिले. हा प्रकार शनिवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास उघडकीस आला. नागरिकांनी या प्रकाराची माहिती पिंपरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी मोरवाडी परिसरात महिलेचा शोध घेतला असता एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने बाळाला जन्म दिल्याची कबुली दिली. तसेच बाळाला रिक्षात टाकून दिल्याचे सांगितले. या महिलेने बाळाला रिक्षात कोणत्या कारणामुळे टाकले, हे अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.