महिलेचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

सांगवी (पिंपरी-चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन – गरोदर मुलीवर दबाव टाकून तिच्याच वडिलांनी गर्भपात केल्याचा खळबजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मुलीचे वडील, मुलगी आणि गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान घडला.

मृणाल धोंडे घोरपडे (वय 33, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सासरा सरोजकुमार शंभुदत्त पांडे (रा. नवी सांगवी), पत्नी अन्नपूर्णीमा उर्फ बुलबुल मृणाल घोरपडे (रा. नवी सांगवी, सध्या रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) आणि गर्भपात करणारी महिला डॉक्टर (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल आणि अन्नपूर्णीमा हे दोघे पती पत्नी असून अन्नपूर्णीमा या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. पत्नीने वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे मृणाल यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी पत्नीला तिच्या घरच्यांकडे २८ जानेवारी रोजी नेऊन सोडले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या पत्नीला मूल जन्माला न आणण्यासाठी दबाव आणला आणि डॉक्टर सोबत मिळून अन्नपूर्णीमा हीच साडेसहा महिन्यांचा गर्भपात केला.

गर्भपात केल्यानंतर अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावली. याची माहिती फिर्यादी मृणाल यांच्या पासून लपवून ठेवली. याबाबत मृणाल यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.