बबली गँगच्या दोन्ही तरुणी अखेर गजाआड, 5 लाखांचे सोने हस्तगत

ठाणेः पोलीसनामा ऑनलाईन – सोन्याचे दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन सेल्समनला बोलण्यात गुंतवून बांगड्या चोरी करणा-या बबली गँगच्या दोन महिलांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेले जवळपास 5 लाखांचे सोने हस्तगत केले आहे. या दोघीही ठाणे येथे चोरी करून कुर्ला टर्मिनस येथून उत्तर प्रदेशची गाडी पकडून पळून जाणार होत्या. तोच नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद लबडे व त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

आयुषी गुलाब शर्मा (वय 26 ) व संजू रविंद्र गुप्ता (वय 34 रा. मीरा रोड) असे अटक केलेल्या चोरट्या महिलांची नावे आहेत. याबाबत ज्वेलर्स मालकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ठाण्यातील गोखले रोड येथील रिचेस ज्वेलर्स आर्केड या दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या होत्या. बांगड्या घ्यायचा असल्याचे सांगून त्या दोघीनी 20 ते 25 बांगड्यांच्या डिझाईन पाहिल्या आणि पसंत नसल्याचे सांगून निघून गेल्या. दुकानातील सेल्समनने त्या दोन तरुणींनी पाहिलेल्या बांगड्या उचलून परत ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी 2 सोन्याच्या बांगड्या गायब झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. ज्याची किम्मंत 3 लाख 27 हजार रुपये होती. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या दोघीनी चलाखीने 2 बांगड्या चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी महिलांना मीरारोड येथून अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरलेल्या सोन्याच्या बांगडया हस्तगत केल्या. त्या व्यतिरिक्त ओशिवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या 33 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या असा एकूण 4 लाख 92 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला.

या दोघीजणी सात ते आठ दिवसापूर्वीच मीरा रोड येथे राजाराम शर्मा या नातेवाईकाकडे पेईंग गेस्ट म्हणून आल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी या दोघींना कोल्हापूर येथे अशाच सोन्याच्या चोरी प्रकरणी अटक झाली होती. या दोन्ही तरुणींची जोडी बबली गँग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्यावर यापूर्वी लक्ष्मीपुरा पोलीस ठाणे, राजवाडा कोल्हापूर, कोरगाव, हडपसर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.