2 हजाराच्या लाचेची मागणी करणार्या महिला पोलिसा विरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे ग्रामीण पोलिस दलातील जुन्नर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदाराविरूध्द 2 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने देण्यात आली आहे.
तनश्री लक्ष्मण घोडे (42, बक्कल नं. 1624, पुणे ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या भाच्यावर दाखल असलेल्या गुन्हयात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी महिला पोलिस हवालदार घोडे यांनी तक्रारदाराकडे 2 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली. एसीबीच्या अधिकार्यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस हवालदार तनश्री घोडे या लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. दि. 2 जुलै रोजी एसीबीच्या अधिकार्यांनी लाच प्रकरणाची पडताळणी केली होती. एसीबीचे अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हिवरकर यांनी सखोल तपास करून पोलिस हवालदार तनश्री घोडे यांच्याविरूध्द जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास एसीबीचे अधिकारी करीत आहे. महिला पोलिस हवालदाराविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.