जगातील सर्वात ‘उत्तम’ क्षेत्ररक्षण करणार्‍या जॉन्टी रोड्सनं गंगा स्नान केलं, म्हणाला – ‘शारीरिक आणि आध्यात्मिक फायदा होतो’

ऋषिकेश : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातील बेस्ट फिल्डर म्हणून ओळख असलेले जॉन्टी रोड्स (वय ५०) यांनी ऋषिकेश मध्ये गंगा नदीत डुबकी लगावली. जॉन्टी रॉड्स हे आयपीएलच्या १३ व्या स्पर्धेसाठी भारतात आले आहेत. यावर्षी ते किंग्स इलेव्हन पंजाब या टीमचे कोच म्हणून काम पाहणार आहेत. त्यांनी गंगा नदीत डुबकी मारतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. गंगा नदीच्या थंड पाण्यात डुबकी मारल्याचे अनेक फायदे आहेत असे कॅप्शन त्यांनी फोटोखाली दिले आहे. त्यांच्या या फोटोवर आपले भारतात स्वागत आहे असे युजर्सनी म्हटले आहे. तर हरभजन सिंगने जॉन्टी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भारतभ्रमण केले असून, पुढील वेळेस मलादेखील सोबत घेऊन जा असे सांगितले आहे. जॉन्टी रॉड्स आपल्या कुटुंबासोबत भारतात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले आहेत.

जॉन्टी रोड्स यांनी आपल्या फोटोत ‘हृषीकेश’, ‘मोक्ष’ आणि ‘आंतरराष्ट्रीय योग’ महोत्सव या शब्दांना टॅग केले आहे. जॉन्टी भारतीय पद्धतीनुसार गंगा नदीत गळाभर पाण्यात उभे राहून हात जोडून थांबले आहेत. जॉन्टी यंदा आयपीएलच्या १३ व्या स्पर्धेसाठी भारतात आले असून, किंग्स इल्हेवन पंजाब टीमचे फिल्डिंग कोच म्हणून ते काम पाहणार आहेत. जॉन्टी यांच्या कालखंडात मुंबई इंडियन्स टीमने आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’
जॉन्टी रॉड्स यांच्यावर भारतीय पद्धती आणि परंपरांचा मोठा प्रभाव आहे. जॉन्टीने २०१६ मध्ये जन्मलेल्या आपल्या मुलीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. जॉन्टी रॉड्स साऊथ आफ्रिकेकडून ५२ कसोटी आणि २४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.