मैत्रिणीकडे बघण्याचा जाब विचारणाऱ्या युवकाचा टोळक्याकडून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मैत्रिणीकडे पाहणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने खून केला. ही घटना आज (रविवार) सायंकाळी खराडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

चंदन सिंग (व-३६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडीमध्ये आज सायंकाळी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने युवकाला बेदम मारहाण केली.

मयत युवक हा मैत्रिणीकडे का पाहता याचा जाब विचारण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाले. टोळक्याने चंदन सिंग याला बेदम मारहाण केली. यानंतर चंदन सिंग हा घरी निघून गेला. मात्र, घरी गेल्यानंतर त्याला त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी आले असून परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.