तरुणाला नग्न करून केली बेदम मारहाण, नंतर चाकूनं सपासप वार करून संपवलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एका 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत धारदार शस्त्रानं अनेक ठिकाणी भोसकून निर्घृणपणे ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर या तरुणाचा मृतदेह नग्न अवस्थेत झुडपात फेकून देऊन मारेकरी फरार झाले होते. ही घटना आज सकाळी पडेगाव येथील पावर हाऊस येथे समोर आली. सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ (वय 23, रा. अन्सार कॉलनी) असं मृत तरुणाचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पडेगाव पावर हाऊस जवळील मोकळ्या जागेत आज सकाळी काही नागरिक गेले असता त्यांना नग्नावस्थेत एक तरुण जखमी अवस्थेत झुडपात पडलेला दिसला.

यानंतर नागरिकांनी नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती कळवली. यानंतर पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे, गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, छावणी पोलीस निरीक्षक मनोज पगारे, फॉरेंसिकचे पथक, डॉग स्कॉड यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाची पाहणी केल्यानंतर डोक्याच्या पाठीमागील भागात गंभीर जखम, कंबरेत धारदार वस्तूनं भोसकल्याचे व गुडघ्याला, हाता पायांना बेदम मारहाणीचे व्रण पोलिसांना आढळून आले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. इतकंच नाही तर चौकशीसाठी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं समजत आहे.

मित्राकडे जाऊन येतो असं सांगितलं अन्…
मृत अझहर हा पहाटे 3 वाजता घरी आला होता. त्यावेळी रोहन या मित्राकडे जाऊन येतो असं घरच्यांना सांगून तो घराबाहेर पडला. परंतु तो घरी काही आलाच नाही. यानंतर सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळाली.

जुन्या वादातून खून झाल्याचा संशय
मृत अझहर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता त्याच्यावर यापूर्वी अनेक प्रकारचे आरोप झाले होते. त्याचे अनेकांसोबत वाद होते. जुन्या वादातूनच हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.