पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विहीरीत बूडून मृत्यू 

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन – पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडली. एनडीआरएफच्या पथकाने त्याचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास विहीरीतून काढला.

शिवम बाळासाहेब बांगर (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शिवम बांगर हा मंगळवारी दुपारी त्याचा मित्र उमेश बांगर याच्यासोबत एका शेतामध्ये कांदा बराकीत भरण्याचे काम करत होता. त्यावेळी दुपारच्या उन्हात उकाडा वाढल्याने दोघेही शेतातील विहिरीत एकच्या सुमारास पोहण्यासाठी गेले. ही ५० ते ५२ फुट खोल असलेली विहीर पाण्याने भरलेली आहे. उमेश बांगर याला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो प्लास्टिकची कॅन बांधून पोहू लागला. त्यावेळी पोहताना अचानक शिवम गटांगळ्या खाऊ लागला. त्यानंतर त्याने उमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळातच शिवम पाण्यात बूडू लागला. उमेशने आरडाओरडा केला तेव्हा ग्रामस्थ मदतीसाठी धावले. परंतु शिवम पाण्यात बुडाल्याने त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला.