७ लाख रुपये घेऊन रेल्वे टीसी (TC) पदाचे दिले बनावट नियुक्तीपत्र ; सभापतीला अटक

लातूर : पोलीसनामा आॅनलाइन – रेल्वे टीसी पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन एका तरुणाला ७ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी, बीड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संतोष हांगे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

चाटा (ता. लातूर) येथील बळीराम घुटे या तरुणाला पश्चिम रेल्वे विभागात टीसी पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून गणेश बाबूराव आंधळकर (रा. नांदूरघाट, ता. केज, जि. बीड) या तरुणाने सात लाख रुपयांची मागणी केली होती. हे पैसे आमचे साहेब संतोष हांगे (रा. नांदूरघाट, ता. केज, जि. बीड) व मुकुंद गोरखनाथ काळे (रा. बीड) यांना द्यावयाचे असून तू पैसे दिल्यानंतर तुला ऑर्डर मिळेल, असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे बळीराम घुटे यांनी त्यांच्या आमिषाला बळी पडून पहिल्यांदा एक लाख रुपये, नंतर चार लाख रुपये असे पाच लाख रुपये नगदी दिले. परंतु उर्वरित दोन लाख रुपये दिल्याशिवाय ऑर्डर निघणार नाही, असे सांगून पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे घुटे यांनी आंदळकरच्या बँक खात्यावर पुन्हा दोन लाख रुपये पाठविले.

७ लाख रुपये पोहोचताच घुटे यांना चेन्नईला पाठविण्यात आले, तेथे हौदा शहरात त्यांचे मेडिकल करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर बळीराम घुटे यांच्या हातात टीसी या पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. हे नियुक्तीपत्र घेऊन घुटे चेन्नई येथे रुजू होण्यासाठी गेले असता, सदर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्यांना सांगण्यात आले. परिणामी घुटे यांनी संबंधितांकडे पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली. अखेर बाळीराम घुटे यांनी मुरुड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असता गणेश बाबूराव आंधळकर, मुकुंद गोरखनाथ काळे, संतोष हांगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.