वाकी खुर्द येथे तरुणाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन- पांढऱ्या रंगाच्या नायलॉन कपड्याच्या सहाय्याने एकोणतीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी बारला सोमवारी ( दि. २१ जानेवारी ) दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी खुर्द ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील सुंबरेनगर येथे घडला. मात्र, सबंधित तरुणाने अगदी टोकाचा निर्णय घेवून केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नसल्याने येथील पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे.

तेजस रमेश यादव ( वय – २९ वर्षे, रा. सुंबरेनगर, वाकी खुर्द, ता. खेड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र मयूर नरेंद्र परदेशी ( वय – ३२ वर्षे, रा. परदेशी वस्ती, वाकी खुर्द, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावर वाकी खुर्द ( ता. खेड ) येथील सुंबरेनगर मध्ये तेजस याचे राहते घर आहे. सोमवारी ( दि. २१ जानेवारी ) दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान तेजस याने राहत्या घराच्या छतावरील लोखंडी बारला पांढऱ्या रंगाच्या नायलॉन कपड्याच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. चाकण पोलिसांना याबाबतची खबर मिळताच तातडीने घटना स्थळी दाखल झालेल्या येथील पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून उपस्थित नागरिकांच्या मदतीने तेजस याचा लोखंडी बारला लटकलेला मृतदेह खाली उतरविला.

चाकण पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेवून चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रुग्णालयात विच्छेदन होताच रात्री उशिरा अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह त्याच्या  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तेजस हा अविवाहित असून, त्याच्या मागे आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने येथील पोलिसांनी याप्रकरणी गु.र.नं.२०/२०१९ नुसार, सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राम वाघुले व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.