खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी ‘एलसीबी’च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला पुणे ग्रामीणच्या एलसीबीने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८ वर्षे रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज, पुणे), रिना यशवंत पवार (वय २७ वर्षे रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज, पुणे), पूनम काळू पडवळ (वय २९ वर्षे रा. पिरंगुट ता. मुळशी जि. पुणे) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर २०१८ रोजी लोणीकाळभोर मधील गणपती चौक येथील चेतन ज्वेलर्समध्ये तीन अनोळखी महिला व १ अल्पवयीन मुलाने दागिने खरेदीचा बहाणा करून दुकानदाराची नजर चुकवत ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या दागिन्यांची किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत दुकान मालक गोपाळ शंकर वर्मा यांना सीसीटिव्ही फूटेज पाहिल्यावर चोरी झाल्याची खात्री झाल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून करण्यात येत होता. पथकाकडून गुन्ह्याची माहीती व सीसी टिव्ही फूटेज घेवून ते मल्टीमेडीया, व्हाट्सअ‍ॅप या माध्यमाद्वारे प्रसारीत केले होते. त्यामुळे फुटेजमधील वर्णनाच्या महिला कात्रज पुणे परिसरात राहत असल्याची माहीती एका खबऱ्याकडून पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने कात्रज येथे जावून तेथील परिसरात फूटेजमधील महिलांचे फोटो दाखवून त्यांचे नाव, पत्ता काढून फूटेजमधील ३ महिलांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी व नंदा चव्हाण हिचा १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा यांनी मिळून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबूल केले. त्यांना लोणी काळभोर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या टोळीकडून अशा प्रकारचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून गुन्ह्याचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.

लोणीस्टेशन येथील महाराजा ज्वेलर्स या दुकानातही सुमारे एक वर्षापूर्वी अनोळखी ५ महिलांनी अशाच प्रकारे भिक मागण्याचा बहाणा करून गोंधळ घालत ४८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्या गुन्हयातील गुजरात येथील टोळीला एलसीबी शाखेच्या याच पथकाने सीसी टिव्ही फूटेजवरून निष्पन्न करून जेरबंद केलेले होते.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ता जगताप, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, अक्षय नवले, महिला पोलीस हवालदार सुरेखा लोंढे, लता जगताप, पूनम कांबळे यांच्या पथकाने केली