मॉब लिंचिंगच्या निषेधार्थ रंगकर्मी, दिग्दर्शक एस. रघुनंदन यांनी नाकारला ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटक येथील प्रसिद्ध रंगभूमी कलाकार,नाटककार आणि दिग्दर्शक असलेल्या एस. रघुनंदन यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. मंगळवारी १६ जुलैस त्यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. देवाच्या नावावर मॉब लिंचीग आणि देशभरात बुद्धिवाद्यांचा आवाज दाबला जात असल्याचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हा पुरस्कार नाकारताना जारी केलेल्या निवेदनात त्यांनी देशभरात जे अविवेकी वातावरण पसरविले जात आहे, त्याची निंदा केली आहे. कन्हैया कुमार सारख्या युवकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अडकविणे असो की, UAPA कायद्याचा गैरवापर करीत बुद्धिवादी लोकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न असेल या सर्व घटनांची त्यांनी निंदा केली आहे.

मॉबलिंचिंगच्या घटनांना सत्ताधारी जबाबदार

पुरस्कार परत करणे हा निषेध नसून निराशेतून आलेली असमर्थता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रघुनंदन यांनी निवेदनात म्हंटले की, आज देव आणि धर्माच्या नावावर मॉबलिंचिंग केले जात आहे आणि एवढेच नाही तर खाणं पानाच्या पद्धतीवरून माणसांना मारले जात आहे. मॉबलिंचिंगद्वारे करण्यात येणाऱ्या या हत्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी जबाबदार आहेत. आजचे सत्ताधारी अशा हत्यांचा अप्रत्यक्षरीत्या समर्थन करत आहेत.

विविध लेखकांनी केले समर्थन

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर लगेच त्यांनी पत्रक काढून हा पुरस्कार नाकारला. त्यांनी उचलेल्या या पाऊलाचे विविध लेखकांनी समर्थन केले आहे. समर्थन करणाऱ्या लेखकांत गणेश देवी, सच्चिदानंदन, केकी दारूवाला, अशोक वाजपेयी, नयनतारा सहगल आणि गीता हरिहरन या प्रसिद्ध लेखकांचा समावेश आहे.