एक वर्षांपूर्वी सोनसाखळी हिसकावणारा सराईत गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- एक वर्षांपूर्वी मकर संक्रातीच्या दिवशी अवघ्या एक तासाच्या वेळात पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १० गुन्हे उघडकीस आणून सात लाख ६८ हजार रुपये किंमतीचे २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सोमनाथ मधुकर चोभे (३१, रा. अशोकनगर, श्रीरामपूर, अहमदनगर) याला अटक केली आहे. तर त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. मागील वर्षी संक्रातीच्या सणादिवशी आणि इतर दिवशी महिलांच्या गळ्यातील दागिने चोभे यांनी चाेरले असल्याची माहिती युनिट दोनचे उपनिरीक्षक हर्षल कदम यांना मिळाली. त्यानुसार सहायक आयुक्त पाटील, निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक कदम, कर्मचारी नारायण जाधव, लक्ष्मण आढारी, प्रविण दळे, दत्तात्रय बनसुडे, तुषार शेटे, नितीन बहिरट, संजय गवारे, हजरत पठाण, मयूर वाडकर, फारुख मुल्ला, चेतन मुंढे, संदीप ठाकरे, राहुल खरगे, जमीर तांबोळी, किरण आरुटे, धर्मराज आवटे, दादा पवार, धनराज किरनाळे या पथकाने चोभे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकवल्याची कबुली दिली. पोलिसांनी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दहा गुन्ह्यातील २४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.