महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या दोघाना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई महामार्गावर खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसानी अटक केली आहे. त्यांच्याकडून अश्या प्रकारचे १० ते १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर त्यांच्याकडून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पप्पू शिवाजी कांबळे आणि सनी गौतम घाडगे या दोघांना अटक केली असून दत्ता बाबू सूर्यवंशी हा अद्याप फरार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव पोलीस ठाण्यात लुटमरीचा गुन्हा दाखल असल्याने पोलीस त्याचा तपास करत होते. पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत आरोपींची ओळख पटवली. गुन्हेगार कारसह निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. पप्पू आणि सनी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

प्रताप खिमजी भानुशाली हे २६ एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी हिंजवडी येथील भुजबळ चौकात बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची होंडाई एक्सेंट कार (एमएच १२, एनएक्स ४६५६) त्यांच्याजवळ येऊन थांबली. कारमध्ये चालक आणि मागच्या सीटवर दोनजण बसले होते. प्रताप आणि त्यांचे भाऊ बालाजी यांना प्रत्येकी तीनशे रुपये देऊन मुंबईमधील अंधेरीपर्यंत सोडण्याचे ठरविले. प्रताप यांनी त्यांची बॅग वाहनाच्या डिकीमध्ये ठेवली. बॅगमध्ये वीस हजार रुपये रोख रक्कम बँकेचे पासबुक व कपडे होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोढा स्कीमच्या पुढे गेल्यानंतर चालकाने वाहन थांबवले. वाहनातील तिघांनी प्रताप यांना चाकूचा धाक दाखवून जबर मारहाण केली. प्रताप यांच्याकडील रोख रक्कम, बँक पासबुक आणि सर्व साहित्य घेऊन त्यांना तिथेच रस्त्यात सोडून दिले. याबाबत त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

या गुन्ह्यातील फरार आरोपी दत्ता सूर्यवंशी याच्यासोबत मिळून अटक आरोपींनी २० ते २६ एप्रिलच्या दरम्यान डांगे चौक, वाकड ब्रिज, देहूरोड, सिम्बायोसिस कॉलेज, किवळे या परिसरामध्ये दहा ते बारा जणांना अशाच प्रकारे गाडीमध्ये बसवून गाडी अर्ध्या रस्त्यात थांबवून त्यांना मारहाण करून लुटले आहे. यामुळे तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.